Monday 14 May 2012


भिक्षांदेही....

लई नाय सांगण
जास्त नाय मागण
आनंदाच वाण कधी 
लुटू तरी...

चिमणीची चिव चिव
पाखरांची किलबिल
पानांची सळसळ कधी 
ऐकु तरी...

मातीत घालू पाणी 
कालवू दोन्ही हाती
एखादा आकार चिमुकला 
घडवू तरी...

उन्हाचा कवडसा 
पाडून खोलीभर फिरवा
भिंगान पेपर कधी 
जाळू तरी...

मुंग्याची रांग
तिचा करून पाठलाग
चिमुटभर साखर तिथे 
ठेवू तरी...

काडेपेटीत भुंगा
पकडून ऐकु 
पारम्ब्याना झोका कधी 
खेळू तरी...


आभाळात रांगोळी
सांजला कोण काढतं
छकूलीच कोडं कधी 
सोडवू तरी...

गाईला थोपटा
मनिला कुरवाळा
भूभू ला शेकह्यांड कधी 
करु तरी...

सोसायटीत आजी
असते एकटी एकाकी 
तिच्या घरी जाऊन गोष्टी कधी 
ऐकु तरी...

पलीकडचे आजोबा
एकटेच असतात उदास 
मधुबाला अन नूतन चे विषय कधी 
काढू  तरी....

शाळेत नसते मेंदी 
अन नेलपेंट बी 
छकुलीशी भातुकली कधी 
खेळू तरी...

कोपर्यात पडलेली ट्युबलाईट 
कवाधरन  खुणावतेय
खळ खट्याक अचानक कधी
करू तरी...

'भ' ची बाराखडी
लैच भारी हाये
अधून मधून उजळणी कधी
करु तरी...

गावाबाहेरचे काजवे
तळ्यावरच्या भाकऱ्या 
टेकडी वरून झोपलेले शहर कधी 
बघू तरी...

आरशातील माणूस
आपल्याशी बोलू बघतोय 
त्याला नुसत्या वाकुल्या कधी 
दाखवू तरी....

क्यारमच्या सोंगट्या 
धूळ खात पडल्यात 
क्वीन वरून खोट कधी 
भांडू   तरी...

ढगात असतोय समिंदर
अन समिंदरात ढग
लपाछपीत खोट आउट कधी  
होऊ  तरी....

बुजगावण काय फक्त
शेतातच असतया ?
सवतालाच हा प्रश्न कधी
विचारु तरी....

फेसबुक च्या फार्मविलीवर
लई घुमशान व्हतय 
पार एखाद झाड खरच लावून
वाढवू तरी...

आनंदाचा झरा 
आत आपल्या वाहतोय
राडा रोड वरचा कधी
काढू तरी...

आनंदाचा कंद 
आहे आपल्या दारी
अधून मधून पाणी त्याला कधी 
घालु तरी....

अपडेट वरून तुझ्या 
लई भारी वाटतंय पण 
टपरीवर भेटून मोकळ्या गप्पा कधी 
मारु तरी...

बिझी लाइफ लई मस्त
काम फार मन तणावग्रस्त 
वेळात वेळ काढून कधी
जगू तरी...

ब्यान्कच पासबुक फुगवायाच असो 
किंवा असो हातातोंडाशी गाठ 
पण आनंदच रिकरिंग छोट
उघडू तरी...

सुखी माणसाचा सदरा 
जगात कुठंच नाय मित्रा
पण आनंदाचा होमवर्क कधी
करु तरी......

लई नाय सांगण
जादा नाय मागण
पण एवढी तरी भीक्षा कधी 
घाला तरी...

आनंदाचा होमवर्क कधी
करु तरी...
आनंदाचा होमवर्क कधी
करु तरी...

- आपला अमर 

मन...एकदम...लालचुटुक झालया !!!!


उगा गुदगुल्या नका करू....


झाडाना लोंबकाळंत असलेली वटवाघळ 


आधी ओळखायला शिका....


आणि म्हणूनच...


अनेक जण आयुष्याच्या संध्याकाळंला घाबरून असत्यात....


जे फुलपाखरू असत्यात...


त्याना कोशातून बाहेर पडायची सवय असते....


त्या शिवाय त्याना नवीन सुंदर जन्म भेटत नाय....



अन जे मधमाशी असत्यात....


त्याना सांडलेल्या परागकणाची पर्वा नसते....


कारण एकच....


परागकण सांडल्या  बिगर....


सृष्टी बी बहरत नाय....


- आपलाच अमर






Wednesday 7 September 2011

च्यामारी...तू लय खट्याळ गड्या ...





धुवाधार धुमाकूळ...


कसलं येव्हड घेतलाय खूळ...


ठरवून धिंगाणा घालाची याची खोड...


मजा बघतोय मुसळधार पार...


समजून सांगितल कितीदा तुला...


कसा नेमका येतोस....


बाप्पाचा नवस फेडायला...


अन आमी काय करायचं...


नुसताच...कुड्कुदायाच हुडहुडायाच...


परत वर जाऊन म्हण तू तक्रार करतोयस....


खाली मानस लैई बरसली कि वर जातान म्हण तू आजारी पडतोयस....


हाय का आता तुझी उफराटी तर्हा...


अन खाली आम्हाला येऊन म्हतोय्स...


वर पाप लई झाली कि मगच मी खाली येतोय...


च्यामारी...तू लय खट्याळ गड्या ...


तुझाठाव कोंणाला नाय....


अगदी माझ्या अडाणी मनासारखच...


बरसायचं नाय म्हणाल तर बरसतंय...


आणि आता बरसल म्हणाल तर खोळम्बतय...


तुला शपतेय त्या इंद्रधनूची...


माझ्या खिशात बी लय भारी रंग आहेत....


मनाच्या कुशीत हळुवार पहुडलय...


उगा जाग नको करू...


वरचे लई हेवा करत्यात....


अन म्हणत्यात...तुझी तशी गरज नाय...


पण ते मन तेव्हड पाठवून दे...


ढग बी मीच...


पाउस बी मीच...


कवडसा बी मीच....


अन घ्बुल पावसात पडलेली सावली बी मीच...


च्या मारी...


ढिंगच्याक ढिंग.... ढिंगच्याक ढिंग...



- आपला अमर

पावसाल मिठीत...


मी आज पावसाल मिठीत घेतलं...


तर त्याला शिंका येत होत्या....


म्हणून त्याला घेऊन डॉक कडे गेलो...


तर डॉक थंडीने आजारी होता...


म्हणून त्याला घेऊन उन्हात गेलो...


तर उन्हाला वारा सोसवत न्हवता...


म्हणून मग त्या सगळ्याना तिथेच सोडले 


आणि वार्याला घेऊन फिरायला गेलो


ढग होऊन...

- आपला अमर



Tuesday 30 August 2011

धो धो धिंगाणा



धो धो धिंगाणा
पं पं ट्राफिक जाम
भर पावसात कुणा येतो घाम
मिरची फारच तिखट

ओली छाती
भाजलेलं कणीस
तुषार उडती
मला शिकविती

कबुतर भिजली
चिमणी शहारली
कौल शेकारली
धरणी हसली

पागोट्याखाली बिडीचा धूर
चुलीतल लाकूड
झुनक्याचा खमंग वास
भाकरी गोल गोड

पाण्याचे ओहोळ
भरलेली नदी
ओढाळ मन
धावे कुठवर

ढग म्हणे बिंदास बोल
माझ्या कड विजा हायत
मी म्हणालो पण
तुजा खिसा आज फाटालाय

समिंदर खावल्लाय
वाळू भिजलीय शेलू तापलीय
अंगठ्यान उगाच नाय
माती उकरतीय

झिम्माड गम्माड
चिंब चिंब मन द्वाड
ओला सर्द नेहमीच गर्द
धुक्यात म्हण...

ना दिवस ना रात्र !

- अमर

Saturday 25 June 2011

आठवणी....


क्षणात येती आठवणी अन घन ओथंबून जाती....
प्राजक्त, मोगरा बकुळ शहारतो अन कधी कधी काटे हि बोचती

मंद स्मित, सुहास्य वदन, अवखळ ते मंजुळ गान....
हृदय उपाशी, मन भरलेले तृप्त आसवांच्या खजीन्यानी

आनंदाचे, सुख दुखाचे, सहर्ष आणिक क्षणिक सुखाचे...
चिंब होऊनी धुंद पिसारा मोर येथे अवचित कुणाचा नाचे ?

सतार छेडी अनवट ताना, मंजुळ स्वर ते बासरीचे....
तरीही गुंजते व्होयलीन ते विरहिणी मग कोण छेडे ?

मधूनच वाजे शीळ अन्तरीची, खट्याळ तरीही बापुडवाणी...
तवंग उठती पाण्यावरती आणिक थवे उडती पक्षांचे

अरे हि तर माझी गुपचूप डायरी, सांभाळलेली प्रेमभरे...
मी मलाच पाठवलेल्या पत्रांची अलगद मजला मग मिठी पडे!

आपला अमर,









Wednesday 15 June 2011

सदाफुली...


जमल्यास आज एक करा
एक मोगर्याचा गजरा आणा...

सोबतीला बकुळ फुले किंवा
निशिगंध अथवा एखादा गुलाब बावरा ...

माळा तिच्या केसांमध्ये
किंवा ओंजळीत अरपण करा तिच्या...

अन फक्त एव्हडेच म्हणा
किती करतेस माझ्या साठी...

रोज, रोज...सदाफुली तू!!!

आपला अमर

वट पौर्णिमा, बुधवार दि.१५ जून २०११